सातारा प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. ‘राज्य आणि देशही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानादिवशी वाढदिवस साजरा होतो, यासारखी वेदनादायी गोष्ट नाही. त्यांनी गादीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचाही वारसा चालवावा,’ असे सावंत यांनी म्हंटले.
यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस सावंत म्हणाले, काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. राज्यात आता काँग्रेसच्या मजबूत संघटनासाठी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे; पण राज्य आणि देशात सुरू झालेले राजकारण हे देशाला अस्ताकडे नेणारे आहे. विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होतोय. जाती, धर्मात संघर्ष व्हावा, अशीच भूमिका आहे. देशात ११ वर्षांपासून भाजप सत्तेत असून, लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही काँग्रेसला साथ द्यावी लागेल. कारण, विरोधी पक्षच राहिला नाहीतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणाराच कोणी राहणार नाही.