सातारा प्रतिनिधी । आज सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठीचा निकाल लागला असून कोरेगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. या ठिकाणी महेश शिंदे यांना 1 लाख 46 हजार 166 मते पडली असून शशिकांत शिंदे यांना 1 लाख 01 हजार 103 मते पडली आहेत. महेश शिंदे यांनी ४५ हजार ०६३ मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. तर फलटणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे पाटील यांनी 1 लाख 19 हजार 278 मिळवला असून दीपक चव्हाण यांना 1 लाख 02 हजार 241 मते पडली आहेत. या ठिकाणी सचिन पाटील यांनी १७ हजार ०४६ मताधिक्यने विजय मिळवला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी शड्डू ठोकला होता. कोरेगाव मतदारसंघात यंदाही काटे की टक्कर पाहायला मिळाली. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. याहीवेळेस शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
फलटण विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या तयारीत होते. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हेच फलटणचे किंगमेकर राहिलेले. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे यांनी आव्हान उभे होते. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा करिष्मा काही पहायला मिळाला नाही. आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कस लावत उमेवार निवडून आणला. दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती.