कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनद्वारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. परंतु टेम्भू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. या कारणाने आज रयत क्रांती संघट्नेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ओगलेवाडी येथे जाऊन शामगावला टेम्भूचे पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा निवेदनाद्वारे इशारा दिला.
रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांच्यासह शामगाव ग्रामस्थांनी आज टेम्भू धरण कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व ओगलेवाडी येथील सिंचन व्यवस्थापन विभागातील अभियंता नरवडे या अधिकाऱ्यांची भेट घेतली. येत्या तीन चार दिवसात पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
शामगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्या पूर्वी टेम्भू योजनेचे पाणी शामगावला पाईपलाइनद्वारे कायम स्वरूपी मिळावे यासाठी पाच दिवस शामगाव येथे उपोषण केले होते. भविष्यात या योजनेला मंजूरी मिळून पाणीही मिळेल पण आता ज्या शेतकरयांनी लाखो रुपये खर्च करून बोबळवाड़ी तलावातून पाइपलाइन केली आहे. त्यांची पीके पाण्याअभावी वाळत चालली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला गेले महीनाभर पाणी देता आले नाही तसेच शामगावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर झाला आहे.