ऊस दरासाठी रयत क्रांती संघटना शुक्रवारी करणार आंदोलन : सचिन नलवडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली. दरम्यान, याबाबतचे निवेदन कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना दिले असल्याचे देखील नलवडे यांनी सागितले.

ऊस दराबाबत सचिन नलवडे म्हणाले की, एक वर्षभरापासून बाजारपेठेमध्ये साखरेचे दर 36 रुपये च्या आसपास स्थिर राहिले आहेत व यावर्षी 38 ते 39 रुपये साखरेला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती डिसलरी अल्कोहोल असे द्वितीय पदार्थ घेतल्याने त्याचाही फायदा कारखान्यांना झाला आहे. माळेगाव व सोमेश्वर या साखर कारखान्यांनी 11.80 उतारा असताना एफआरपी पेक्षा साडे पाचशे ते साडेतीनशे रुपये जास्त दिले आहेत.

Karad News 20231122 164242 0000

मग जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दुधाला सरकारने जाहीर केलेला भाव सध्या मिळत नाही. लिटरला पाच ते सात रुपये कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे म्हणून दुधाला 35 रुपये हमीभाव मिळावा ही मागणी सुद्धा या आंदोलनात करण्यात येणार आहे.

कराड भागातील शेतकरी हा क्रांतिकारक विचाराचा आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी 3500 उसाचा दर घेत असेल तर आपला शेतकरीही मागे राहणार नाही त्याला सुद्धा असाच उसाचा भाव मिळवून द्यायचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी गट तट पक्ष विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नलवडे यांनी केले आहे.