कराड प्रतिनिधी | वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. हुंडा विरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यात वैष्णवी सारख्या महिलेचा जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून राज्य महिला आयोग याबाबत कडक भूमिका घेत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब, युवक अध्यक्ष सुरजदादा चव्हाण तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चाकणकर म्हणाल्या, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. काहीजण ताब्यात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे. कारवाई तर होणारच आहे पण त्याचा महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत. खरंतर राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत. पण पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे कोणीही असले तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही.उलट ही विकृती ठेचून काढली पाहिजे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.तर राजेंद्र मागवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केले असल्याचेही त्या म्हणाल्या.
महिला आयोगावर बोलणाऱ्या ‘त्या’कोण?
राज्य महिला आयोगाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. या रोहिणी खडसेंच्या विधानाकडे लक्ष वेधले असता चाकणकर म्हणाल्या, खरंतर महिला आयोगावर बोलणाऱ्या त्या कोण आहेत? त्या तर वडिलांच्या नावावर निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याच कार्यालयातील पीए आणि त्याच्या बायकोच्या तक्रारी माझ्याकडे आहेत. त्या महिलेला त्या न्याय देवू शकत नाहीत.याचा त्यांनी अगोदर विचार करावा. उलट राज्य आयोगाचे काम गेल्या साडेतीन वर्षांमध्ये चांगले चालले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्याला विशेष महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही.
यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, विचार आणि नेतृत्व हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी…
यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, विचार आणि नेतृत्व हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या दिवशी पुन्हा एकदा मनाशी बाळगला असल्याचे देखील चाकणकर यांनी यावेळी म्हटले.