फवारणी ड्रोनला 4 लाख रुपये अनुदान; शेतकऱ्यांसाठी ड्रोनच्या वापरास संधी

0
2

सातारा प्रतिनिधी । कृषी क्षेत्रात मानवविरहित वायू यान म्हणजे ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे. कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, खतांची फवारणी या बाबींव्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामांसाठीही ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत आणि कष्टातही बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते. यासाठी शासनाकडून चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. २०२४-२५ साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील ड्रोनसाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येणार आहे.

ड्रोनने फवारणीचा काय फायदा?

पिकांवर रोग पडल्यास किंवा रोग पडू नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. फवारणी करण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळही खर्च होतो. शिवाय विषारी औषधांमुळे जीविताचा धोका उ‌द्भवू शकतो. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करणे सोपे झाले आहे. ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी स्वतःच फवारणी करतील किंवा तज्ज्ञ ड्रोन प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करवून घेऊ शकतील.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज…

कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये ड्रोन हा घटक ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था आणि कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

कोणाला अनुदान मिळणार?

  • शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्थांना ४० टक्के म्हणजे ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • कृषी व तत्सम पदवीधर यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये अनुदान दिले जाईल.
  • अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती. लहान व सीमांतिक महिला शेतकरी यांना ५० टक्के म्हणजे ५ लाख रुपये, तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • मार्गदर्शक सूचनेनुसार किसान ड्रोन व त्याच्या संलग्न जोडणी साहित्याची मूळ, वास्तविक किमत असेल, त्यापैकी जे कमी असेल ती अनुदान रक्कम देय राहणार आहे.