सातारा प्रतिनिधी | वाठार स्टेशन येथील सोन्या- चांदीचे व कपड्याच्या दुकानाचे शटर तोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील तिरुपती कलेक्शन व सह्याद्री ज्वेलर्स या दोन्ही दुकानांचे अज्ञात चोरट्याने कटावणी व लाकडी बांबूच्या साहाय्याने शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानाबाहेर असलेल्या लाइट व कॅमेऱ्याचे कनेक्शन कट करून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानात असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ती उघडता आली नसल्याने दुकानात काचेच्या कपाटातील लहान मुलाच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची मोड, कानातील टॉप्स, चांदीचे पैंजण, चांदीच्या मूर्ती, करंडा, चांदी कडा अशा चांदीच्या दोन लाख ३८ हजार रुपयांच्या वस्तू व तिरुपती कलेक्शन या दुकानातून गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीचे कॉइन, स्वेटर, बनियन, जर्किंग, ब्लॅंकेट, जीन्स पॅन्ट अशा एक लाख ४७ हजार रुपये किमतीच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
याबाबत गणेश भोईटे व मनोज अग्रवाल यांनी वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.