कराड प्रतिनिधी । येत्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. राज्यात देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल. लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे केला. यावेळी त्यांनी एकंदरीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, पक्ष त्यांचा हा विजय स्वीकारत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून त्यांचे तत्व आत्मसात केले जाऊ शकत नाहीत त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार व भाजपला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या लोकसभेतील यशानंतर आ. रोहित पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर, प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिंची उपस्थिती होती. रोहित पवार म्हणाले की, अजित पवार राष्ट्रवादीत आता एकटेच राहतील बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील. याबाबत लवकरच कळेल. साताऱ्यात आमचा उमेदवार हा विजयी झाला असता, तो निवडून येणारच, या विचारात व विश्वासात आम्ही होतो.
कारण आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो होतो. उदयनराजे भोसले यांचा विजयी झाला. ते जिंकले त्याबद्दल व्यक्तिगत मी त्यांना शुभेच्छा देतो पण पार्टी म्हणून आम्हाला ते पटलेलं नाही. कारण ज्या पार्टीने नेहमी महाराष्ट्राला पाण्यात बघितले. खाली आणण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाजप यांचा या ठिकाणी विजय होणं हे या परिसराला विचारला पटणार नाही, पण जी काही करणे असतील त्याचा नक्कीच अभ्यास करावा लागेल, असे रोहित पवार यांनी म्हंटले.
यशवंतराव चव्हाण यांचे विचार फोटो लावून मिळत नसतात
यावेळी रोहित पवार म्हणले की, यशवंतराव चव्हाण यांचे विचार हे फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात कि ते पवार साहेबांनी जपले आहेत. त्यामुळे अनेकवेळा महत्वपूर्ण जो दिवस असतो त्यावेळेला मी किव्हा पवार साहेब त्यांच्या परिवारातील लोक या ठिकाणी येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. तत्व हे चव्हाण साहेबांची महत्वाचे होतेच. संतांनी सुद्धा तत्वाचे महत्व आपल्या सर्वांना सांगितले आहे. त्या तत्वाच्या गोष्टी चव्हाण साहेबांनी जपल्या. पवार साहेब देखील त्या गोष्टी जपत आहेत. म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या गोष्टी जपत आहोत. फोटो लावून तत्व आत्मसात केले जाऊ शकत नाहीत त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार व भाजपला लगावला.
भाजपच्या विचाराला नाकारलं
बारामतीकरांनी आत्याला निवडून दिलं आणि काकीला नाकारलं यावर रोहित पवार म्हणाले, बारामतीकरांनी आजपर्यंत विचाराला पाठिंबा दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना आजपर्यंत बारामतीकरांनी पाठिंबा दिला आणि भाजपच्या विचाराला नाकारलं आहे. भाजपकडून प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचा अवमान होत गेल्यामुळे त्यांना महाराष्ट्राने दाखवून दिला आहे.
काकींच्या पराभवावर रोहित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पराभवबद्दल व सुप्रिया सुळे यांच्या यशाबद्दल रोहित पवार याचना यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खरे सांगायचे झाले तर या ठिकाणी विचाराची हार झाली हे महत्वाचं आहे. भाजपने जो पर्यटन केला होता. कुटुंब फोडून पुरोगामी विचार कुठेतरी पायाखाली तुडवायचा. ते लोकांनी होऊ दिलेले नाही विचार जिंकला हे आमच्यासाठी जास्त महत्वाचे असल्याचे रोहित पवार म्हणाले.
म्हणून मी ‘तसे’ ट्विट केले
‘बच्चा बडा हो गया है!’ असे आपण ट्विट केले आहे. नेमके हे तुम्हाला कोणाला सांगायचे आहे? असा प्रश्न विचारताच बच्चा म्हणून ज्यांनी आम्हाला या निवडणूक प्रचारात हिणवले होते. त्यांच्यासाठी माझे ते मत आहे. आता तर लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन निकालातून दाखवून दिले आहे की बच्चा कोण आहे ते. आम्ही तर स्वतःला आजही कार्यकर्ता समजतो. पण युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. असच मला सांगायचे आहे, असे रोहित पवार म्हणाले.
कुणाला तिकीट द्यायचं, हे साहेबच ठरवतील
योगेंद्र पवार पुढचे आमदार असतील का यावर रोहित पवार म्हणाले की, तिकीट कोणाला, कसं द्यायचं, हे साहेब ठरवतात. साहेबांना याबाबत विचारावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते पश्चिम महाराष्ट्रातील योग्य निर्णय घेतील. येणाऱ्या काळात 200 च्या पुढे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले पाहायला मिळतील. त्याच्यात अनेक मेजॉरिटीने नवीन चेहरे पाहायला मिळतील, असे रोहित पवार म्हणाले.