सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी चांगला लढा दिला. पण, मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला. दरम्यान, कराड दौऱ्यावर असताना रायगडकडे जाताना आमदार रोहित पवार यांनी काल कोरेगावमध्ये जाऊन शशिकांत शिंदेंची भेट घेतली. तसेच पराभवांच्या कारणे जाणून घेतला. विधानसभेला हे चालणार नाही. येत्या काळात हा जिल्हा पुन्हा एकदा पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिल आणि आपल्या विचारांचे आमदार निवडून येतील, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी रोहित पवार याजी माध्यमांशी देखील संवाद साधला. ते म्हणाले की, शशिकांत शिंदेंनी चांगला लढा दिला. शरद पवारांप्रति त्यांची निष्ठा, प्रेम, पुरोगामी विचारांवरील श्रध्दा या सगळ्याबाबी मलाही आवडतात. या गोष्टींचा मी आदर करतो. मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय यावर रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायची आहे. महाविकासचे हे नाते अधिक घट्ट करायचे आहे. कमीत कमी दोनशे जागांवर उमेदवार निवडून आले पाहिजेत. तसेच सत्ताही आपलीच आली पाहिजे. जनतेच्या हितासाठी काहीतरी करता यावे हा यातून प्रयत्न असेल. सातारा जिल्ह्यात वेगळे लक्ष देऊन आपल्या विचारांच्या उमदेवारांना ताकत दिली जाईल. जेणे करुन सत्ता आल्यावर महाराष्ट्र व जिल्ह्याचा विकास होईल, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.