सातारा जिल्ह्यातील येरळवाडी तलावात परदेशी पाहुण्यांचे आगमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पावसाळा आला कि सातारा जिल्ह्यातील पर्यंटन स्थळांवरील निसर्ग चांगलाच खुलतो. या निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना जशी भुरळ पडते तसेच परदेशातील पक्ष्याना देखील पडते. मात्र, सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे येथील तलावातील पाणी आतले आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे रोहित पक्षी (प्लेमींगो) या परिसरात दाखल झाले आहेत. मनाला भूरळ घालणारे स्थलांतरित प्लेमिंगो पाहुणे पक्षी मुक्कामास आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील तलाव परिसरात पक्ष्यांचा वावर वाढल्याने निरीक्षणासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सैबेरिया, चीन, अफगाणीस्तान, रशिया आदी देशातून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. सध्या तलावात चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे.

हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. लालबुंद चोच, लांबसडक मान, लांब पाय असे त्यांचे लोभस रूप असते. प्लेमिंगो यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. सध्या या पाझर तलावात फ्लेमिंगोंची संख्या कमी असली, तरी येत्या काही दिवसांतच हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल होतील. फ्लेमिंगोंच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली मनाला मोहून टाकतात. फ्लेमिंगोंबरोबर इतर पक्ष्यांचेही थवेच्या थवे येऊ लागले आहेत.