भाजपमुळेच आज राज्यात फोडाफोडीचं राजकारण; साताऱ्यात रोहिणी खडसेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. शिवाय ते गढूळ देखील झाले आहे. ते म्हणजे राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळे होय. स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर कोणते आव्हान असेल तर ते या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. इतकेच नाही तर शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे, असे देखील खडसे यांनी म्हंटले.

सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांचा आज मेळावा पार पडला. तत्पुर्वीखडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, देशात व राज्यात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत.

दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. माझी नियुक्ती झाल्यानंतर मी देखील राज्याचा दौरा केला आहे. यादरम्यान महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिक परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांमध्ये अंतर्गत वाद नाहीत. मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद नाहीत. पक्षात मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा पक्ष लोकशाहीनुसार चालतो. कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जाते. इतर पक्षांमध्ये दबावतंत्र वापरले जाते, कार्यकर्त्याला बोलू दिले जात नाही, तशी परिस्थिती राष्ट्रवादीत नाही. गेल्या दहा वर्षाची आकडेवारी पाहता भाजपाच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षातून जास्तीत जास्त संधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.