सातारा प्रतिनिधी । फलटण शहरातील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी 17 ते 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 25 हजाराची रोकड लुटली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून भरवस्तीत असे साहस करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे.
फलटण शहरातील कॉलेज रोड अर्थात शुक्रवार पेठेतील अनघा या बंगल्यात राहणारे दिलीप फणसे हे मंगळवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी मागच्या दोन-तीन दिवसात केव्हातरी या बंगल्याला लक्ष्य केले. मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील तिजोटी कपाटे उचकटून सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. कपाटांमध्ये ठेवलेले 17 ते 20 तोळे सोन्याचे दागिने व जवळपास 25 हजार रुपयांची रोकड त्यांनी लुटली. दरम्यान, फ्रीज उघडून आतील खाद्यपदार्थही फस्त केल्याचे दिसून आले.
गावाहून परतल्यावर घटना उघड शनिवारी रात्री अकराच्या सुमारास फणसे कुटुंबीय फलटणला पोहोचले. गेट उघडून दरवाज्याजवळ आले तेव्हा दरवाजाचा कोयंडा तोडल्याचे त्यांना पाहायला मिळाले व त्यांना धक्काच बसला. घरात गेल्यानंतर आतील दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसेतज्ञ व श्वानपथक दाखल रातोरात ठसेतज्ञांना व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. तथापि, श्वान त्याच परिसरात घुटमळले. चोरट्यांनी लक्ष ठेवून बंद घर फोडल्याचे सांगितले जात आहे. भरवस्तीतच दणका देऊन चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.