सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील पिरवाडीत आपल्या आईसोबत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांच्या घरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरी झाली तेव्हा चित्रपटाच्या तसेच मालिकेच्या शूटिंगसाठी ती मुंबईत गेली होती. हीच वेळ साधून सातारा शहरातील पिरवाडी येथील तिच्या घरातील सोन्याचे दागिने चोराने लंपास केले.
यावेळी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील कपाट जाळण्यात आले. त्यानंतर त्यातील दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याविषयीची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. माहितीनुसार, सोमवारी 3 जून रोजी हा चोरीचा प्रकार घडला आहे. दहा तोळ्याचे दागिने आणि पैसे चोरीला गेले आहेत. नेमकी रक्कम किती होती, ते सांगता येणं अवघड आहे. त्यावेळी आई घरात नव्हती त्यामुळे तिला काही झालं नाही, हे माझं सुदैव आहे. मी यासंदर्भात एफआयआर नोंदवली आहे.
सातारा पोलीस लवकरच चोराला शोधून काढतील, असा मला विश्वास आहे. मी एक नागरिक म्हणून पोलिसांकडे तक्रार करण्याचं माझं काम केलं आहे आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. ते चांगलं काम करतील, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. या सगळ्या घटनेनंतर काहीतरी चांगलं निष्पन्न होईल, काहीतरी चांगला निष्कर्ष निघेल, अशी मला आशा आहे, असे श्वेता शिंदे यांनी म्हंटले आहे.