कराड प्रतिनिधी | जिल्ह्यात सद्या चोरट्यांच्याकडून घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच कराड येथील एका डॉक्टरच्या घरावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असताना खटाव तालुक्यात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या आशा संजय पानस्कर यांच्या सूर्याचीवाडी येथील घरात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकली असून यामध्ये 10 तोळे सोने व सुमारे पावणे दोन लाख रुपयांची रोकड अशी 6.50 लाखांची चोरी केली आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथे माजी पंचायत समिती सदस्या आशा संजय पानस्कर यांचे घर आहे. या ठिकाणी गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेसाठी गावातील ग्रामस्थ गेले होते. यावेळी आशाताई पानस्कर व त्यांचे पती संजय पानस्कर हे दोघे घराला कुलूप लावून रानातील कामे करण्यासाठी गेले होते. सायंकाळी शेतीतील कामे करून ते घरी परतले असता घराच्या दरवाजाला लावलेला
कडीकोयंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसले.
यानंतर दोघांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील वस्तू इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसल्या. चोरट्यांनी लोखंडी कपाट उचकटून त्यातील 1 लाख 81 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. तसेच 10 तोळे सोन्या- चांदीचे 4 लाख 37 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अजय कोकाटे, मायणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल माने आदीसह पोलिस हवालदार दीपक देवकर यांनी धाव घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद वडुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.