सातारा प्रतिनिधी | दुपारच्यावेळी घरमालक घरात नसताना चोरी छुपे दरोडेखोर घरात घुसले. अन् चोरी करणार तेवढ्यात घर मालक आला. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी घरमालकावर सपासप वार केले असल्याची थरारक घटना शिवथर, ता. सातारा येथे शुक्रवारी भर दुपारी घडली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात विठ्ठल नामदेव साबळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी कल्पना साबळे यांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली आहे. दरम्यान, अन्य एका ठिकाणी डाव साधत चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. या घटनांनी शिवथर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबती माहिती अशी, विठ्ठल साबळे व कल्पना साबळे हे पती-पत्नी शुक्रवारी घराला कुुलूप लावून सातारा येथे गेले होते. रस्त्याच्या कडेलाच त्यांचे घर आहे. दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसरा चोरटा दुचाकीवर बसून बाहेरूनच लक्ष ठेवून होता. घरामध्ये ऐवजाची शोधाशोध सुरू होती. नेमक्या त्याचवेळी विठ्ठल साबळे पत्नीसह घरी पोहोचले. त्यावेळी कुलूप तोडल्याचे त्यांना दिसले. प्रथम कल्पना साबळे या घरामध्ये गेल्या. त्यावेळी आतील चोरट्याने त्यांना ढकलून देऊन लाथा मारण्यास सुरुवात केली. घरांमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर विठ्ठल साबळे हे आत मदतीला धावून गेले.
त्याचवेळी बाहेर दुचाकीवर टेहळणी करत बसलेल्या चोरट्याने त्यांना पकडले व दारातून दुसर्या चोरट्याने येऊन त्यांना ढकलून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु विठ्ठल साबळे हे दोघांनाही पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. आरडाओरडा झाल्यामुळे शेजारील रत्नदीप जाधव हा तेथे धावून गेला. लोक जमा होत असल्याचे पाहून चोरट्याने सत्तुरासारखे धारदार शस्त्राने विठ्ठल साबळे यांच्यावर हल्ल्ला केला. दोन ते तीन वार करून त्यांना जखमी केले. शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करत दुचाकीवरून दोघे दरोडेखोर पसार झाले. या घटनेत विठ्ठल साबळे गंभीर जखमी झाले असून सातारच्या शासकीय रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांनी विठ्ठल साबळे यांच्या घरातून गंठण लंपास केले आहे
दुसर्या एका घटनेत आनंदराव साबळे व त्यांची पत्नी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असताना त्यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरीला गेलेल्या ऐवजाची माहिती समजू शकली नाही. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, ठसे तज्ञ व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.