कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याच्या कारणाने या विरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शुक्रवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील कराड ते सातारा लेनवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीकडे प्रशासनाकडून व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणांनी उंब्रजसह परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. तसेच संबंधित ठेकेदाराकडून तारळी नदीवरील पूल पाडण्यासाठी घाई केली जात होती. दरम्यान, उंब्रज येथील उड्डाण पूल लवकर करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकाकडून केली जात असताना त्याकडे संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात होते. या विरोधात आक्रमक झालेल्या उंब्रजसह परिसरातील ग्रामस्थांनी आज शुक्रवारी सकाळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड – सातारा लेनवर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ठेकेदाराच्या कार्यपद्धतीचा निषेध देखील करण्यात आला.
यावेळी महामार्गावरील कराड-सातारा लेनवर मोठ्या संख्येने एकत्रित आलेल्या ग्रामस्थांमुळे वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान, पोलिसांच्यावतीने ग्रामस्थांना रोखून धरण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काहीकाळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आंदोलक ग्रामस्थांनी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासोबत उडाणपुलासंदर्भात चर्चा केली. यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूर यांनी दिले.
उंब्रजच्या ग्रामस्थांचा रास्तारोको; कराड-सातारा लेनवरील वाहतूक ठप्प pic.twitter.com/wYsuQXuCa5
— santosh gurav (@santosh29590931) March 15, 2024
गेली २ वर्षापासून उंब्रजमध्ये उड्डाणपूल उभारण्यात यावा, यासाठी उंब्रसह परिसरातील गावातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सतत होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी आणि नाहक बळी जाणारी जनता याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी आंदोलनकर्त्याच्या वतीने उपस्थित करण्यात आला. यावेळी मारूती शेठ जाधव, महेश बाबा जाधव, निवास थोरात, सरपंच माणिक जाधव, इंद्रजीत जाधव, विकास जाधव, शंकरराव शेजवळ यांच्यासह मोठ्या संख्येने उंब्रज आणि परिसरातील ग्रामस्थानी उपस्थिती लावली होती. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.
…तर तीव्र स्वरूपात आंदोलनं करण्यात येईल
आज उंब्रजसह परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेत पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड- सातारा लेनवर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलन माध्यमांशी देखील संवाद सोहळा. आज करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनासंदर्भात पोलिसांच्या वतीने लवकरच महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. आहे. जर बैठक घेण्यात आली नाही तर उंब्रजमधील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, अशा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.