सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ असणार्या कास पुष्प पठाराला लागलेले रस्ता दुरवस्थेचे ग्रहण सुटलेले नाही. कास पठार ते कास तलाव या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तलावापर्यंत मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. घाटाई फाटा ते कास तलाव हा रस्ता नक्की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की सातारा नगरपालिकेकडे हे कोडे उलगडलेले नाही. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी कोणी करायची?, असा सवाल केला जात आहे.
कास-बामणोली परिसरातील कोयना भाग 105 गावांतील लोकांच्या दळणवळणासाठीचा पूर्वीपासूनचा असलेला प्रमुख मार्ग हा सातारा-कास पुष्प पठार-कास तलाव मार्गे बामणोली भागात जातो. मात्र, हाच रस्ता धरणामुळे बाधित झाला. याच मुख्य रस्त्याला लागून पुढे केलेला रस्तादेखील खड्ड्यात गेला आहे.
जावलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच कास बामणोली भागातील वाढते पर्यटन हे याच रस्त्यावरून सुरू असते. त्यामुळे घाटाई फाटा, कास तलाव, कास गाव या रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. यासाठी बांधकाम विभाग आणि सातारा नगरपालिकेने समन्वय साधून हे काम करावे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे