सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला आहे : रो.मोहन पालेशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला असून मी, माझी बायको व माझे कुटुंब अशी त्याची वृत्ती झाली आहे. स्वकेंद्रीत वृत्तीमुळे समाजातील प्रश्न कधी आपल्या कुटुंबापर्यत येऊन पोचतील, हे कळणारही नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो. मोहन पालेशा व्यक्त केले.

कराड येथील दि कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ कराड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभात ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने यांचा पदग्रहण झाला. तर रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन प्रेसिडेंट धिरज निकम व नूतन सेक्रेटरी प्रशांत माने यांचा पदग्रहण झाला. यावेळी मानद सदस्य तहसीलदार विजय पवार व दिलीपभाऊ चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पालेशा म्हणाले, वाढते वृध्दाश्रम सामाजिक संवेदना बोथट होत असल्याचे लक्षण आहे. वृध्दाश्रमे बंद होण्याऐवजी आत्ता पंचतारांकित वृध्दाश्रमांची संकल्पना पुढे येत आहे, ही दुर्दवी बाब आहे. यावेळी शायरी व कवितांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘आईची साद” कवितेतील’ महिन्यांमागून महिने गेले शेवटी वर्ष सरुन जाते, वृध्दाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते, भिजुन जातो पदर अन मन रिते राहते कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते, पैसै नकोत यावेळी तुच येऊ जा बाळा मला तुझ्या घरी घेऊ जा” या ओळींनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या प्रमुख दोन प्रोजेक्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. सेक्रेटरी शिवराज माने यांनी क्वालिटी लाईफ थ्रु माईंड मॅनेजमेंट या प्रोजेक्टची मांडणी करताना याचा लाभ विविध शाळा व महाविद्यालयातील 10 हजार विद्यार्थ्यांना होणार असल्याचे व मानसिक स्वास्थ्या बाबत जागरूकता निर्माण होणार असल्याचे सांगितले.

संचालक आनंदा थोरात यांनी ॲनिमिया फ्री इंडिया प्रोजेक्टच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील ॲनिमिया फ्री गावे, ॲनिमिया फ्री अंगणवाडी, ॲनिमिया फ्री शाळा, ॲनिमिया फ्री महिला बचत गट अशी संकल्पना राबविण्यात येणार असून सेंद्रीय पोषक परस बागांच्या निर्मितीतून ॲनिमिया मुक्त नागरिक होण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के यांनी रोटरी क्लब ऑफ कराडच्यावतीने वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मावळते प्रेसिडेंट रो प्रबोध पुरोहित यांनी स्वागत केले. रो किरण जाधव व रो पल्लवी यादव यांनी सूत्रसंचालन केले. रो शिवराज माने यांनी आभार मानले.