सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. या धर्तीवर साताऱ्यातील मोती चौकात दंगा काबू पथकाने आज प्रात्यक्षिक सादर केलं. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार साताऱ्यात दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. पोलीस मुख्यालय या ठिकाणी जलद प्रतिसाद पथक कार्यान्वित आहे. या पथकाला अधिक सक्षम बनविण्याकरीता केंद्रिय जलद कृती दलास पाचारण करण्यात आलं होतं. केंद्रिय जलद कृती दलाचे पोलीस निरीक्षक राजकुमार सिंह आणि त्यांच्या जवानांनी सातारा पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकास जातीय दंगल / दंगा काबू करण्याचे ७ दिवसाचे प्रशिक्षण दिलेले आहे. या प्रशिक्षणामुळे जलद प्रतिसाद पथकाची कार्यक्षमता वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज, मोती चौकात दंगा काबूचं प्रात्यक्षिक pic.twitter.com/xnyEXh0i2h
— santosh gurav (@santosh29590931) April 20, 2024
या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून शनिवारी सातारा शहरातील मोती चौकात जलद प्रतिसाद पथकाने जातीय दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिका दरम्यान १ हॅन्ड ग्रेनेड आणि एका गॅसगन सेलचा वापर करण्यात आला. यामध्ये ३ राखीव पोलीस निरीक्षक व ६८ पोलीस जवानांचा सहभाग होता. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी या पथकाचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अचानक कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर परिस्थिती योग्यरित्या हाताळता येणार आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, शाहुपुरीचे रविंद्र सावंत्रे, राखीव पोलीस निरीक्षक बाळू आलदर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे पोलीस निरीक्षक राजकुमार सिंह, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, ३ राखीव पोलीस उपनिरीक्षक, १० कवायत निर्देशक, ९० पोलीस अंमलदार तसेच ५ पोलीस वाहने या प्रात्यक्षिकात सहभागी होती.