कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीस्थायी कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर
विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने नियुक्त केलेले निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षक पी. सेंथील यांनी कराड उत्तर व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास आज भेट दिली. यावेळी कामकाजाची पाहणी करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निर्णय अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे उपस्थित होत्या. दरम्यान, निरीक्षक पी. सेंथील यांचेनिवडणूक निरयन अधिकारी म्हेत्रे यांनी स्वागत केले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, पी. पी. कोळी, गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
निरीक्षक पी. सेंथील यांनी यावेळी लेखा शाखा कक्ष, पत्रव्यवहार कक्ष, उपकोषागार कक्ष, उमेदवार खर्च व भत्ते वाटप कक्ष, माध्यम (मीडिया) कक्ष, व्हिडिओ पाहणी पथक कक्ष, संगणक (आय टी सेल) कक्ष आदी कक्षांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत सूचना केल्या. त्यानंतर कराड दक्षिणच्या निवडणूकीच्या कामासाठी नियुक्ती केलेल्या सर्व पथकातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच नियुक्त सर्व नोडल ऑफिसर यांना सेंथील यांनी कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.