सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांकडून मतदार संघाचा आढावा घेण्याचे काम केले जात आहे. यात राष्ट्रीय काँग्रेसनेही जोरदार तयारी केली असून गुरुवारी केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली.
सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त निरीक्षक आणि कर्नाटकातील माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत निरीक्षक सोरके यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघातील साताऱ्यासह वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे राहील. पण, माण आणि वाई मतदारसंघही मिळावा, अशी जोरदार मागणी केली.
यावर निरीक्षक सोरके यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचे असेल तर घराघरातील माणूस पक्षाशी जोडायला हवा. बुथ कमिट्या आणखी बळकट कराव्यात, अशी सूचना केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ मिळण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे प्रयत्न करण्यात येतील, असे निरीक्षक सोरके यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.