सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सोनलबेन पटेल बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ प्रभारी निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांच्या बैठकीसाठी त्या आल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
काॅंग्रेसच्या सचिव पटेल म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शुक्रवारी पुण्यात इतर तीन जिल्ह्यांची बैठक होत आहे. निवडणुकीत काय काम करायचे, कशी रणनिती आखायची याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने वाॅर रुम तयार केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. आघाडीतून जे उमेदवार असतीत त्यांना विजयी करु. त्याचबरोबर सध्या काँग्रेसला वातावरण चांगले आहे. आमचा पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा आहे. तर सांगली आणि सोलापूर मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार असणार आहे.
साताऱ्यात पृथ्वीराज बाबांच्या उमेदवारीबाबत महत्वाचं विधान
सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस मतदारसंघ मागणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पटेल यांनी पृश्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कोठेही स्वागतच होईल. आजच्या बैठकीत सातारा मतदारसंघाची मागणी झाली नाही. पण, पुण्यातील बैठकीत सातारा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याबाबत आणि पृश्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेल्याच्या प्रश्नावर त्यांनी दबावातूनच राजकीय नेते भाजपात जातात. सध्या दबावाचेच राजकारण सुरू आहे. ही लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. पण, भाजपमध्ये जाणाऱ्यांचे हालच होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहवाल 8 दिवसांत द्या…
साताऱ्यातील बैठकीत पक्षाच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचनाही केली. तर पंचायत समितीस्तरावर तत्काळ बैठक घेऊन त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्षांना आठ दिवसात सादर करावा. पक्षवाढीसाठी पुढाकार घ्या. ज्या कमिट्या, सेल अपूर्ण आहेत. ते तत्काळ पूर्ण करावेत, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे
शेट्टी ‘मविआ’ सोबत आल्यास प्रश्न सुटेल…
पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नावर पटेल यांनी माढ्याबाबत आमचा विचार नाही. पण, हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहेत. ते महाविकास आघाडीबरोबर आल्यास त्यांना जागा सुटू शकते असे सांगतले. तर गुजरातमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सांगण्यात येते, याबद्दल आपले मत काय ? पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी मी गुजरातची आहे. तेथे बोगस मतदान होते. गुजरात ही भाजपची प्रयोगशाळा आहे. तेथे प्रयोगच होतात, असेही ठामपणे सांगितले.