कोळेवाडीच्या ग्रामसभेत EVM विरोधात ठराव; पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | ईव्हीएम मशिनवर होणारे मतदान संशयास्पद होत असल्याचे आमचे मत आहे. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून (बॅलेट पेपरवर) मतदान घ्यावे, अशा मागणीचा ठराव कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे.

ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानंतर कोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले की, देशात संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक व मतदान संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आताच्या सारखा मतदानात संशयकल्लोळ कधीच झाला नाही. मात्र, सध्याचे मतदान, निकाल व अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. हे लोकशाहीला मारक आहे. साधारण २००० पासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अलीकडेच देशभरात ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे? हा प्रश्न आहे.

ईव्हीएमची मतदान प्रक्रिया संशयास्पद का झाली? याबाबत आमच्याही मनात संशय व शंका आहेतच. विशेषतः सत्ताधारी पक्षाबद्दल सर्वत्र मतदारांमध्ये वातावरण असताना व मतदारांची होणारी सत्ताविरोधी मानसिकता लोकशाहीसाठी खूपच धोकादायक वाटते. यासाठी खुल्या मनाने व संशयविरहीत मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे. त्यामुळे भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली, तरीही पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे केली असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.