सातारा प्रतिनिधी । दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गडे, तहसीलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पाणी, वीज यासह नागरी सुविधा उभारण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री डुडी म्हणाले, ज्या ज्या वेळी जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल त्यात्या वेळी दरड प्रवन व धोकादायक गावांमधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्रांमध्ये हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी. यास गावांमधील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने खबरदारी घ्यावी, निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच काही शाळा व काही मंगल कार्यालये ही निवारा केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर नागरिकांनी तातडीने या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहनही जितेंद्र डुडी यांनी केले.
या वेळी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी मीरगाव येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांना निवारा केंद्रांमध्ये जाण्याविषयी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे साकव वाहून गेलेल्या चाफेर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ओझर्डे येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची ही त्यांनी पाहणी केली व याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.