सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या वतीने शहरातील होर्डिंग्जधारकांना आपला स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील पाच व्यावसायिकांनी ३९ होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मंगळवारी पालिकेकडे सादर केला. तर आठ होर्डिंगधारकांनी अहवाल सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, पालिकेने बजावलेल्या नोटिसीचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासनाने मुदतवाढ देण्यास असमर्थता दर्शवली असून, होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकारकडून अनधिकृत व उंच होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश सर्व महानगर पालिका आणि पालिकांना दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून देखील शहरातील होर्डिंग धारकांना त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट अहवालसादर करावा, असे आदेश दिले होते. त्याची कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
सातारा पालिकेकडे नोंद असलेल्या शहरातील ४१ व्यावसायिकांकडून पालिकेची मालकी असलेल्या व खासगी इमारतींवरती एकूण ३०० होर्डिंग उभारण्यात आले आहेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना तातडीने नोटीस बजावून होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल, होर्डिंग उभारण्यासाठी दिलेले परवानगी पत्र, होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, रुंदी याची माहिती, होर्डिंग उभारण्यात आलेल्या मिळकतीचा उतारा, करारनामा, मिळकत व जाहिरात कर भरल्याची पावती आदी दस्तऐवज तीन दिवसांत पालिकेत सादर करण्याचे आदेश दिले होते. या आवाहनाला प्रतिसाद देते आतापर्यंत केवळ पाच होर्डिंगधारकांनी ३९ होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल पालिकेत सादर केला. तर आठ जणांनी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.
मात्र, पालिकेने दिलेल्या नोटिसीचा कालावधी समाप्त झाला असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीदेखील नादुरुस्त व कमकुवतहोर्डिंग तत्काळ काढून टाकून अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनकारवाईवर ठाम आहे. सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध होताच शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविले जातील, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.