सातारा प्रतिनिधी | विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास नुकतीच सदिच्छा भेट दिली. येथील विविधरंगी पुष्पांचे सौन्दर्य, प्रसन्न, शुद्ध तसेच आल्हाददायक वातावरण अनुभवून ते मंत्रमुग्ध झाले. कास पठारावरील निसर्गाच्या सान्निध्यामुळे आपणास अत्युच्च कोटीचे आणि आश्चर्यकारक असे भावनिक समाधान मिळाले. तसेच या परिसरास केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर मानसिक समाधानासाठी सुद्धा वारंवार भेट देण्याचा मोह होतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
सातारा येथील डॉ. अजित कुलकर्णी यांनी साताऱ्यातील राधिका पैलेस येथे नुकतेच एक होमियोपैथीवरील विचारमंथन शिबीर आयोजित केले होते. त्यात डॉ. याकीर यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानातून अत्यंत उद्बोधक असे मार्गदर्शन उपस्थित डॉक्टरांना केले. या व्याख्यानात डॉ. याकीर यांनी पंचमहाभूते, वनस्पती विकासाचे टप्पे आणि प्रकिया तसेच या दोहोंचा होमियोपैथी चिकित्साशास्त्राशी असलेला अन्योन्य संबंध याबद्दल मौलिक विवेचन केले.
यावेळी पार पडलेल्या शिबिरात डॉ. याकीर यांच्या हस्ते डॉ. अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या Harmony In Totality – Vol – २ या १००० हुन अधिक पृष्ठाच्या होमियोपैथीवरील नवीन अभ्यासपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यानंतर त्यांनी कास पठार व ठोसेघर धबधबा परिसरास भेट दिली.