सातारा प्रतिनिधी | सातारा येथील पोलिस परेड ग्राऊंडवर निमा रन फॉर हेल्थ 2024 च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा व नोंदणी प्रक्रियेस रविवारपासून सुरुवात झाली. यावेळी सातारा हील हाफ मॅरेथॉनचे संस्थापक व साताऱ्यातील मॅरॅथॉन चळवळीचे प्रणेते डॉ. संदीप काटे यांच्या शुभहस्ते नोंदणस प्रारंभ करण्यात आला.
रविवार 27 ऑक्टोबर, 2024 रोजी साताऱ्यात निमा रन फॉर हेल्थ 2024 संपन्न होत आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून ही रन 10 किमी व 3 किमी या 2 मुख्य प्रकारासह वेगवेगळ्या वयोगटात होणार आहे.
यावेळी डॉ. काटे म्हणाले की, रुग्ण आजारी पडल्यानंतर डॉक्टर्स लोकांची रुग्णसेवा नेहमीच करतात. मात्र, निमा रन फॉर हेल्थच्या माध्यमातून लोकांनी आजारीच पडू नये, यासाठी देखील डॉक्टर्स प्रयत्न करीत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे डॉ. काटे यांनी नमूद केले. तरी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच निमाचे अध्यक्ष डॉ अनिल शिंगे व निमा रन फॉर हेल्थ 2024 चे अध्यक्ष डॉ सुधीर पवार यांनी स्पर्धेविषयी उपस्थितांना माहिती दिली. याठिकाणी उपस्थित धावपटूंनी नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे पहिल्या दिवशीच 500 नोंदणी फॉर्म्सचे वितरण झाले.