सातारा प्रतिनिधी । येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. काही पात्र उमेदवाराचे नावाने वगळले जाणार नाही, तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल केले आहेत. 83 मतदान केंद्रांच्या नावात बदल केलेला आहे. नवमतदारांच्या नोंदणीत राज्यात सातारा जिल्हा अव्वल आहे. गेल्या दोन वर्षांत दोन लाख पाच हजार 828 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे.
नवीन मतदान केंद्रेनिर्मितीत जिल्हा आघाडीवर असून, मतदार यादीतून मयत मतदारांची नावे खात्री करून वगळली जातील. बोगस नवमतदारांची नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल केले जातील तसेच 73 मतदान केंद्रांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे. एक मतदान केंद्र रद्द केले आहे.
जिह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार जिह्यात 25 लाख 88 हजार 219 मतदारांची नोंदणी आहे. यामध्ये 13 लाख 16 हजार 963 पुरुष, 12 लाख 71 हजार 153 महिला, तर 103 तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी आहे. जिह्यात 20 हजार 147 दिव्यांग, 37 हजार 476 मतदार 85 वर्षांकरील आहेत. 18 ते 19 वर्षे वयोगटातील 52 हजार 865 मतदार आहेत. नवमतदारांच्या नोंदणीत जिल्हा राज्यात अव्वल आहे. गेल्या दोन वर्षांत दोन लाख पाच हजार 828 मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. तर, एक लाख 79 हजार 166 मतदारांची नावे विविध कारणांनी वगळण्यात आली आहेत.