पाण्याच्या टँकरबाबत आ. दीपक चव्हाण यांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार दीपक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरबाबत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २६ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या-ज्या गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत, ते तसेच सुरु ठेवावेत. पाण्याची उपलब्धता होईल, त्याप्रमाणे त्याबाबत आपण निर्णय घेऊयात, सद्यस्थितीत टँकर सुरूच ठेवावेत,’ असे स्पष्ट निर्देश आ. दीपक चव्हाण यांनी दिले.

कोरेगाव येथील टंचाई आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहायक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे, नायब तहसीलदार उदयसिंग कदम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तम आंधळे उपस्थित होते.

यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, राज्यात सर्वदूर सध्या पाऊस पडत असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये कमी-अधिक प्रमाणात तो होत आहे. विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांनी टँकर सुरु ठेवण्याची मागणी आजही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने पावसाचे कारण देऊन टँकर बंद करू नयेत. गावनिहाय आढावा घेऊन गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे स्रोत जर वाढले असतील तर त्याबाबत तपासून घेऊन कार्यवाही करूया; मात्र सद्य:स्थितीत एकही टँकर बंद करू नये.

संजीवराजे नाईक-निंबाळकर, अभिजित नाईक, डॉ. संगमेश कोडे यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी ग्रामसेवक, तलाठी यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करण्याबाबत त्यांनी सूचित केले. यावेळी उत्तर भागातील गावनिहाय आढावा घेण्यात आला. सरपंच व उपसरपंच यांच्यावतीने अडीअडचणी मांडण्यात आल्या. त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, बाजार समितीचे माजी उपसभापती गुलाबराव जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

चारा टंचाईबाबत लवकरच राज्य सरकार बरोबर चर्चा करू

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात चारा डेपो सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आपण सरकारकडे सादर केला होता. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तो विषय पाठीमागे पडला होता. आज रोजी चारा टंचाई जाणवत असून, त्या बाबतीत येत्या काही दिवसात निर्णय होण्याची न शक्यता आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार बरोबर चर्चा केली जाईल, असे आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.