खा. श्रीनिवास पाटलांच्या खंबाटकी घाटातील महत्वाच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभा अधिवेशनात दिली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी बोगद्याच्या बांधकामाबाबत प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता त्यावर मंत्री गडकरी यांनी उत्तर दिले.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या सहापदरीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच महामार्गावरील विविध सोयीसुविधांबाबत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा.श्रीनिवास पाटील यांनी रस्ते विकास मंत्रालयास अतारांकित प्रश्न विचारले. यावेळी खा. पाटील म्हणाले की, पुणे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी कामाची सद्यस्थिती काय आहे?

शेंद्रे-कागल विभाग आणि शेंद्रे-पुणे विभाग दरम्यान किती काम पूर्ण झाले आहे? तसेच कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्या कामाची गती वाढवावी. नागठाणे, पारगाव आणि वेळे येथील उड्डाणालाच्या काम, शिरवळ येथील ओव्हर ब्रिज, उंब्रज येथील उड्डाणपूल, खंबाटकी घाटाजवळील एस-टर्नच्या ठिकाणचे बांधकामे लवकर पूर्ण करून महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खा. पाटील यांनी केली.

खा. पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कराड येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून त्याचे २७% काम पूर्ण झाले आहे. तर ऑक्टोबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नागठाणे येथील अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. वेळे गावात उड्डाणपूल होणार आहे. खंबाटकी घाटातील सहापदरी दुहेरी बोगद्याचे बांधकाम येत्या डिसेंबर पर्यंत होणार आहे. तर पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपुलाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी डीपीआर करण्यात आल्याचे गडकरी यानी उत्तरामध्ये म्हंटले आहे. याशिवाय उंब्रज येथील पारदर्शक उड्डाणपूलासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी मंत्री गडकरी यांना समक्ष भेटून त्याच्या पूर्णतः साठी विनंती देखील केली आहे.