कराड प्रतिनिधी | सातारा बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनाच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालच्या वादानंतर दोन्ही राजेंनी आज सकाळी कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. या भेटीनंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राजेंसोबत विकासकामा संदर्भात आज चर्चा झाली. वास्तविक दोन्ही राजे विकासकामांसाठी आग्रही आहेत. दोघांनाही जनतेचे प्रश्न त्याठिकाणी मांडायचे आहेत. अशा गोष्टी कधीकधी होत असतात. असे नाही कि काही तरी गंभीर गोष्ट घडतेय किव्हा फार अडचणीचे आहार असे काहीही नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माझी भेट घेतली या दोघांच्या भेटीमध्ये तासभर विविध प्रश्नांवर माजी चर्चा झाली. येथील काही सिंचनाचे प्रश्न आहेत यासह अनेक प्रश्न होते. त्यावर चर्चा केली. दोन्ही राजेंना जनतेची विकासकामे करायची आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.
दरम्यान, आज सकाळी कराड येथील मलकापुरातील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पस येथे भाजपा सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर ते बैठकीसाठी रवाना झाले. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्ररसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भरत पाटील, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मदन भोसले, मनोज घोरपडे आदी मान्यवर उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी सकाळी दोन्ही राजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली.