सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर स्थानके आरडीएक्सने उडविण्याची धमकी देण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली. या प्रकारानंतर बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली असून रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांना स्फोटाच्या धमकीचा फोन आला. अज्ञाताने सांगितले की “मी दहशतवादी आहे. माझ्यासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे पोहोचल्या आहेत. आरडीएक्सने या स्थानकांत स्फोट करणार आहेत,” अशा धमकीचा फळ आल्यानंतर याची दखल घेत पोलिस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधिक्षक रितू खोकर यांच्यासह पोलिस पथके सांगली व मिरज स्थानकांत दाखल झाले.
सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना संदेश देऊन मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहनांची झडती घेण्यात आली. रुग्णवाहिका, अग्नीशमन यंत्रणा, खासगी व सरकारी रुग्णालये यांना सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. यादरम्यान, बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली. त्यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही.
या मोहिमेत सांगली, मिरजेतील पोलिस अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, दंगलविरोधी पथक, दहशतवादविरोधी पथक आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, सांगली व मिरजेतील गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती स्थानिक गुन्हे अश्न्वेषण शाखेच्या वतीने देण्यात आली.