कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे.
याबाबत रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सचिन नलवडे, मठाधिपती संपत गिरी गुरू रघुनाथ गिरीगोसावी, पार्लेचे उपसरपंच मोहन पवार, राजन. धोकटे, दीपक माळी, प्रकाश शिंदे, दीपक जाधव, सागरा हाके, शशांक नांगरे, मनोज डांगे, हेमंत पाटील, शुभम नलवडे, अभिजीत निकम, विनोद नलवडे, अशोक नलवडे, गणपत नलवडे व शेतकरी उपस्थित होते.
सचिन नलवडे म्हणाले, रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणापूर्वी रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता होता. तर दुहेरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. त्या जागेत रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. वास्तविक भूसंपादन व मोबदल्याबाबत आंदोलन सुरू असताना रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता हे आश्वासन रेल्वे प्रशासन पाळत नाही.
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने अजूनही मातीचे ढीग, दगड, चिखल तसाच असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. विरवडे व पार्ले गावच्या हद्दीवर या गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले आवडगिरी महाराजांचे देवस्थान आहे. येथे भागातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, वर्षातून दोन ते तीन वेळा मोठ्या यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रम होत असतात.
दुहेरीकरणापूर्वी या ठिकाणी ये- जा करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता होता. हा रस्ता बंद झाल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांची हद्द कायम केली नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे सचिन नलवडे यांनी दिला आहे.