सातारा प्रतिनिधी । प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शुक्रवार दि. ९ रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती ‘प्रहार’चे माण खटाव विधानसभा निवडणुकीचे उमेदवार तथा सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी नुकताच ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी राज्यभरातील सर्व दिव्यांगाना आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही प्रतिमहा ६ हजार रुपये पेन्शन दिली जावी आदींसह इतर अनेक मागण्या राज्य शासनाकडे केलेल्या आहेत. या मागणीची पुर्तता होण्यासाठी शुक्रवार, दि. ९ रोजी छ. संभाजीनगर याठिकाणी राज्यभरातील दिव्यागांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी माण-खटाव विधानसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्ते सहभागी होतील.
प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आमदार बच्चु कडु यांनी अरविंद पिसे यांचे आजवर सुरु असलेले कार्य पाहुनच राज्यात सर्व प्रथम विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहिर केली आहे. माण-खटावच्या पाणी प्रश्नाची सखोल माहिती असणारे व्यक्तीमत्व अशी अरविंद पिसे यांची ओळख आहे. सर्वसामान्यांचा आधारवड ठरलेल्या अरविंद पिसे यांच्या एका आवाहनानुसार माण – खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी छ. संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलन व मेळाव्यास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.