सातारा प्रतिनिधी | बुलढाणा येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर रात्री साताऱ्यात उशिरा दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाची घोषणा केली. “वाडा विरुद्ध गावगाडा अशी राज्यात तीव्र नाराजी आहे. राजकारणाच्या प्रवाहात विस्थापितांचे शोषण होत आहे, अशा विस्थापितांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रभर लवकरच दौरा करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साताऱ्यातील पत्रकार परिषदेत तुपकर पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या संक्रमणाची वेळ आहे. चांगल्या दर्जाचे व विचारांचे तरुण राजकारणात यायला पाहिजेत. मात्र, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. राजकारणात असलेली नैतिकता संपत चालली आहे. सातारा जिल्हा चळवळींचा आहे. या चळवळींनी जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला गती दिली. मात्र, आजच्या राजकारणामध्ये वैचारिक चळवळीसह तरुण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत.
राजकारण प्रस्थापितांचे बनले असून राज्यातील राजकारणांविषयी सामान्य जनतेच्या मनात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी दूर करून समाजातील विस्थापितांची मोट बांधण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात बुलढाणा येथून करणार असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रदेशनिहाय दौरा होणार आहे. या दौऱ्यामध्ये चांगल्या विचारांचे तरुण पुढे आणून त्यांना राजकारणात सक्रिय करणे आणि शेतकरी व तरुणांचे प्रश्न घेऊन वैचारिक चळवळी वृद्धिंगत करणे हा मूळ हेतू असल्याचे तुपकर यांनी सांगितले. विदर्भामध्ये कापूस व सोयाबीन तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस दर हे प्रश्न दरवर्षी गंभीर होतात, असे तुपकर यांनी म्हटले.