सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील कार्डधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ती गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेऊन रद्द असलेली, राजीनामा दिलेलीव लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दि. 1 जानेवारी 2024 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११६ गावात रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी कागदपत्रासह तहसिलदार यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
सातारा जिल्यात सातारा तालुक्यातील 12 व शहरी भागातील 1 ठिकाणी, वाई तालुक्यातील 17 व शहरी भागातील 1 तसेच कराड तालुक्यातील 7, महाबळेश्वर तालुक्यातील 45, खंडाळा तालुक्यातील 08, कोरेगाव तालुक्यातील 13, खटाव तालुक्यातील 07, फलटण तालुक्यातील 05 अशा एकूण 116 ठिकाणांचा समावेश आहे.
याठिकाणी रास्त भाव दुकाने सुरु करण्यासाठी संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांच्याकडे दि.1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 अखेर ( सुट्टीचे दिवस सोडून) अर्ज करणे आवश्यक आहे. तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने यांनी केले आहे.