सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील रेशनींग दुकानदारांच्या समस्या तसेच त्यांच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. याबाबत जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेकडून अनेकवेळा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असलयामुळे रेशनिंग दुकानदारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शिधा वाटप दुकाने १ जानेवारी २०२४ पासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवली जाणार आहेत.
याबाबत प्राप्त झालेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे, रेशमी धान्य वाटपाचे कमिशन सध्याच्या महागाईनुसार वाढवून मिळावे किंवा शिधा वाटप दुकानदारांना प्रतिमास ठराविक मानधन मिळावे. दुकानदारांना दिलेल्या ‘थम्ब इंप्रेशन’ यंत्रे जुनी झाल्यामुळे ती वारंवार बंद पडत आहेत. ती पालटून द्यावीत.
यंत्राला २ जीबीचे नेटवर्क आहे. त्यामुळे पावत्यांसाठी वेळ लागत असतो. दुकानदारांना ५ जीबीचे नेटवर्क देण्यात यावे. सर्वरच्या समस्या दूर करण्यात याव्यात. यांसह अनेक मागण्यांची शासनाने नोंद न घेतल्याने ‘ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन’ने हा बंद पुकारला आहे. यात सातारा शहरासह परिसरातील सुमारे १ हजार ७०७ हुन अधिक दुकानदार सहभागी होणार असल्याचे परिपत्रकात म्हंटले आहे.