सातारा जिल्ह्यातील रेशन दुकान बंद आंदोलन तूर्त स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | रेशन दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्यावतीने एकत्रित आवाहनानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील 56,200 रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारलेले होते. मात्र, मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चेनंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता मुंबई येथे मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देवल यांनी महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील व फेडरेशनचे राज्य अध्यक्ष डोळसे पाटील, तसेच दोन्ही राज्य संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली होती.

या बैठकीत दुकानदारांचे कमिशन वाढ व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नवीन येणार्‍या मंत्रीमंडळापुढे आपणा सर्वांची एकत्रित बैठक घेवून हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे आश्वासन श्री. देवल यांनी दिले व आचारसंहितेमुळे आपण हे बंद आंदोलन मागे घ्यावे, असे सूचित केले.

बैठकीत राज्य संघटनेचे पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेत दिवाळी सण लाभार्थी कार्डधारकांना सुखकर व्हावा यासाठी आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून रेशननिंग दुकानदार कार्डधारकांना सर्व सेवा व्यवस्थित देतील, असे श्री. शेटे यांनी सांगितले.