कराड प्रतिनिधी । रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हाताने लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र, आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. ही यंत्रे पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ७१२ स्वस्त धान्य दुकानांमध्ये याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच टूजी ऐवजी आता फोरजी ई- पॉस मशीन रेशन दुकानात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच रास्तभाव दुकानात ई-पॉस यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः कष्टाची कामे करणारे, धुणीभांडी करणाऱ्या महिला, वयोवृद्ध यांना ही समस्या जाणवते. परंतु, ठसे जुळत नसले तरी लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. आय स्कॅनरमुळे ही समस्या सूटणार आहे.
जिल्ह्यात 3 लाख कुटुंबांना मिळते रेशन
सातारा तालुक्यात सध्या ‘अंत्योदय’चे २७ हजार ७ आणि प्राधान्य गटाचे ३ लाख ६२ हजार ०४२, असे ३ लाख ८८ हजार ९०७ गार लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील १ हजार ७१२ रेशन दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरित करण्यात येते.
आता हाताची बोटे नाही तर डोळे स्कॅन होणार
आपल्या हाताच्या बोटाची ठसे जुळत नसतील तर लाभार्थ्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते. यामुळे आता आधुनिक पद्धतीचे ‘आय स्कॅनर गन’ दिली जाणार आहेत. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई-पॉस यंत्रावर येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे.
ठसे जुळत नसल्याने अडचण
शिधावाटप दुकानात येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांमध्ये अनेक जण वयस्कर असतात. वयोमानानुसार त्यांचे ठसे जुळत नाहीत. त्यामुळे शिधावाटप करताना अडचण येते. अंगठा बायोमेट्रिक केल्याशिवाय त्याला धान्य देता येत नाही. लाभार्थ्यांना दुकानामध्ये तासन् तास ताटकळत बसावे लागते.
कोणत्या तालुक्यात किती रेशनकार्डधारक
१) कराड : २८७, २) सातारा : २२४, ३)खंडाळा : ८३, ४)वाई : १०९, ५) फलटण : १८०, ६) माण : १३९, ७) जावली : ९५, ८) पाटण : २५५, ९) खटाव : १५९, १०) महाबळेश्वर : ४७