सातारा प्रतिनिधी । अत्यंत दुर्मीळ अशा जंगली वाघाटी मांजरींनीपासून दुरावलेल्या ३ पिल्लांची आणि आईची भेट वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्राणिमित्रांनी घडवून आणली. फलटण तालुक्यातील खटके वस्ती (गवळीनगर) येथील आनंदराव खोमणे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजुरांना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) या अतिदुर्मीळ जंगली मांजराची ३ पिल्ले आढळली होती.
याबाबतची माहिती खोमणे यांनी फलटण वन विभागातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सातारच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, फलटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र कुंभार, वनरक्षक राहुल निकम, ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे प्राणिमित्र सचिन जाधव, मंगेश कर्वे यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन ती पिल्ले ताब्यात घेतली.
ही पिल्ले वाघाटी या दुर्मिळ रानमांजराची असल्याची खात्री केल्यानंतर, ती पिल्ले सापडलेल्या जागेची पाहणी केली. ही पिल्ले पुन्हा त्यांच्या आईच्या ताब्यात देण्याचे त्यांनी ठरवले. या कामी पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्रेयश कांबळे व हृषिकेश मोरे यांची मदत घेण्यात आली. या टीमने ती पिल्ले त्याच जागी सायंकाळी सहाच्या सुमारास एका प्लॅस्टिक बॉक्समध्ये ठेवली.
त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले. त्यानंतर एका एका तासाच्या अंतराने येऊन पिल्लांची आई त्यांना घेऊन गेली. वाघाटी मांजर आणि तिच्या पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. या कामी विराज गावडे, राधेश्याम जाधव, बजरंग खोमणे, आनंदराव खोमणे या गावकर्यांची मोलाची मदत झाली.
वाघाटी मांजराच्या नोंदी फक्त भारत आणि श्रीलंकेत
वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट, जीवशास्त्रीय नाव – प्रीओनाइलुरस रुबिगिनोसस) ही मांजर कुटुंबातील सर्वात लहान सदस्यांपैकी एक आहे. त्यांच्या ऐतिहासिक नोंदी फक्त भारत आणि श्रीलंकेतील आहेत. 2016 पासून ही मांजर जागतिक वन्य लोकसंख्या ‘आययूसीएन’ रेड लिस्टवर आहे.
बिबट्याची हुबेहूब लहान प्रतिकृती
फलटण तालुक्यात असे दुर्मिळ वन्यजीव सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. फलटण तालुका हा वन्यजीवांनी समृद्ध आणि वनसंपदेने संपन्न आहे. वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग आणि त्वचेवरील ठिपके बिबट्याप्रमाणेच असतात. हे मांजर म्हणजे बिबट्याची हुबेहूब लहान प्रतिकृती असते. वाघाटी मांजर हे अतिदुर्मीळ असल्याने ही प्रजाती वाचवणे गरजेचे आहे, असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी व्यक्त केले.