सातारा प्रतिनिधी | फलटण नगर परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून यात लवकरात लवकर सुधारणा करावी. विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सखोल माहिती घ्यावी. येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊ, अशा सूचना माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीदरम्यान माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस निरीक्षक नलवडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण नगर परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम परवाना विभागाची सविस्तर माहिती घेत सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडीअडचणी भेडसावत आहेत त्या प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण येणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करणार असल्याची घोषणा यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा थोडाफार त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करताना प्रत्येक १० मीटर वर पाणी पुरवठा, गटार व इतर गोष्टींसाठी जागा सोडण्यात येणार आहे. त्यामधूनच या सर्व गोष्टी करण्यात येणार आहे, असे यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.