सातारा प्रतिनिधी | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रलंबित असलेले पाण्याचे सर्व प्रश्न येणाऱ्या काही दिवसात मार्गी लागत असून विधानसभेची पुढची होणारी निवडणूक ही पाणी प्रश्नावर होणार नाही याची खात्री आम्हाला सर्वांना आहे, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह माळशिरस व सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील यांच्यासह फलटण, कोरेगाव, माळशिरस व सांगोला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाली की, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील कोरेगाव तालुक्यातील 26 गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी धोम कालव्याच्या माध्यमातून पाणी देण्यात येणार आहे. यासाठी धोम कालव्यात 0.52 टीएमसी राखीव करण्याचा निर्णय सुद्धा सदरील बैठकीत घेण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातून जाणाऱ्या धोम – बलकवडीच्या कॅनॉल हा 100% चार्ज होण्यासाठी वाघोशी येथे पुन्हा कालवा जोड प्रकल्पाद्वारे जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे धोम – बलकवडी कॅनॉल हा 100% क्षमतेने सुरू होणार आहे. आता तो 50% क्षमतेने सुरू असतो. यापूर्वी फलटण तालुक्याला पाणी मिळण्यासाठी उतरोली या ठिकाणी नीरा देवधरचा कॉनॉल हा धोम बलकवडीच्या कॅनॉलला जोडला आहे त्याचप्रमाणे वाघोशी या ठिकाणी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यामध्ये नीरा देवधर कालवा प्रकल्पाचे उर्वरित काम हे येणाऱ्या १५ दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय सुद्धा सदरील बैठकीत घेण्यात आला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सदरील काम सुरू होऊन पूर्णत्वास गेल्याने फलटण तालुका हा 100% बागायती तालुका म्हणून नावारूपास येणार आहे. या सोबतच येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाणी प्रश्नावर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होणार नसल्याचे सुद्धा मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.