सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. हि टंचाई लक्षात घेऊन धोम- बलकवडी प्रकल्पातून काल सकाळी पिण्यासाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. धरणात असलेला अल्प प्रमाणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कालव्या लगतच्या गावांना हे पाणी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत असून, आणखी १.५ टीएमसी पाण्याची मागणी करणार आहे. त्यातून संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे २४ गावांत टंचाई घोषित झाली असली, तरी दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेता टंचाई घोषित गावांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चारा, पाणीटंचाई निवारणासह लोकांना टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नशील आहे. गरज असलेल्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, मागणीप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात येणार आहे.
आगामी काळात चारा डेपो, जादा टँकर व दुष्काळ निवारणार्थ अन्य अडचणींबाबत आपण प्रयत्नशील आहोत. कोणाची काहीही अडचण असल्यास संपर्क साधावा. तसेच धोम- बलकवडी प्रकल्पाचे एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी यापूर्वीच्या आवर्तनावेळी २.४० टीएमसी पाणी उपलब्ध झाले. यावेळी धरणात केवळ ०.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याने जादा पाणी उपलब्ध करून घेऊन जास्तीतजास्त गावांपर्यंत पाणी पोचविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत लोकांनी पाणी केवळ पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.