फलटणच्या जाहीर सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर निशाणा; म्हणाले की, तीस वर्षे सत्ता असून सुध्दा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | श्रीमंत रामराजे हे माझे व्यक्तिशः शत्रू नसून त्यांनी फलटणला विकासाच्या बाबतीमध्ये मागे टाकण्याचे काम केलेले आहे. ते जर विकासाला दोन पाऊल पुढे आले असते तर त्यांच्यासोबत मी सुद्धा चार पावले पुढे आलो असतो परंतु त्यांच्याकडे तब्बल तीस वर्षे सत्ता असताना सुद्धा फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही, असा टोला भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला.

फलटण येथील गजानन चौकात सोमवारी जाहीर सभा पार पडली. या सभेत माजी खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, गत तीस वर्षांपासून फलटण तालुका हा विकासाच्या बाबतीत अत्यंत मागे पडलेला आहे. फलटण तालुक्याच्या शेजारी असलेल्या बारामती तालुक्याचा जर विचार केला तर बारामती मध्ये विकास काय झाला आहे. हे सर्वच फलटणकर जाणतात कुणालातरी हरवायचे म्हणून सचिन कांबळे – पाटील यांना निवडून देण्याऐवजी ज्यांनी फलटणचा विकास केला नाही अश्यांचा पराभव करून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सचिन कांबळे – पाटील यांना निवडून द्यावे.

शरद पवारांनी फलटणच्या नेमका काय विकास केला?

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत निष्णात असे नेते असून त्यांच्या नखाची सर सुद्धा मला नाही व येणार सुद्धा नाही. माढा लोकसभा मतदारसंघांमधून ते जेव्हा उभे होते तेव्हा माझ्या वडिलांचा विरोध असताना सुद्धा मी त्यांना सांगितले होते की; पवार साहेबांसारखा नेता आपल्या मतदारसंघांमधून उभा असेल तर बारामती प्रमाणे आपल्या मतदारसंघाचा सुद्धा नक्की विकास होईल या बोलीवर मी लोकनेते हिंदुराव यांची समजूत काढून त्यांना सुद्धा पवार साहेबांच्या प्रचारासाठी सोबत घेतले होते. परंतु पवार साहेब हे आपल्या माढा लोकसभा मतदारसंघांमधून निवडून जाऊन सुद्धा फलटण तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघासाठी पवार साहेबांनी काय केले हा प्रश्न मला नेहमी पडतो, असे मत रणजितसिंह यांनी यावेळी म्हंटले.