सातारा प्रतिनिधी । सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत अधिवेशनासाठी गेले आहेत. या दरम्यान, दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची व प्रकल्पांची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेमध्ये व विकासकामांच्या मंजुरी व निधी याबाबत सर्वोत्कृष्ट काम केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गत निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनता त्यांना विजयी करून त्यांच्या कार्याची पोचपावती देईल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, दुष्काळी मतदार संघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये कोणतीही पाण्याची योजना शिल्लक ठेवली नाही. तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये कमी पडलो नाही.
यापुढेही पक्ष संघटना व जनतेसाठी सातत्याने संपर्क ठेऊन मतदारसंघाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही खा. निंबाळकर यांनी दिली. तुम्ही केलेल्या विकासकामांवर सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष, महायुतीतील घटक पक्ष, कार्यकर्ते, जनता समाधानी आहे. पुढील काळातही असेच चांगले काम करा, असा सल्ला देऊन जे. पी. नड्डा यांनी खा. निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले.