सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रतील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा निरा-देवधर प्रकल्पाचा प्रश्नाबाबत सातत्याच्या पाठपुरावा केल्यामुळे हा मार्गी लागला आहे. केंद्र शासनाने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या अंतिम गुंतवणूक स्पष्टतेस मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण, भोर, माळशिरस भागांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, अनेक वर्षे निरा-देवधर प्रकल्प रखडला होता. परंतु केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूरमध्ये येऊन या प्रकल्पास मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारनेही यापूर्वीच मंजुरी देऊन निधीची तरतूद केली होती. आता केंद्र शासनाने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या अंतिम गुंतवणूक स्पष्टतेस मंजुरी दिली.
त्यामुळे या भागातील शेतकरी शेतमजूर यांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व आमच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने राज्यांमध्ये सेन्ट्रल वॉटर कमिशन पाठवून हा प्रकल्प हायड्रोलिजकलदृष्ट्या योग्य आहे की नाही याचा सर्व्हे करून घेतला. भारत सरकारच्या टीमने यास टेक्निकल मंजुरी दिली.
भारत सरकारने यास गुणवत्ता स्पष्टता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले व लवकरच दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे हा परिसर आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल व या भागातील युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. नोकरी निमित्ताने युवकांना मुंबई, पुणेला जावे लागणार नाही, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.