सातारा प्रतिनिधी । बापजाद्यांनी काढलेला कारखाना स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन चालवत आहात. कारखाना तुमच्या खाजगी मालकीचा नाही. तो शेतकर्यांच्या मालकीचा आहे. त्या शेतकर्यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी तुमची अपेक्षा असेल तर मुळीच घेणार नाही. विश्वासराव भोसले यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. फलटणची जनता तुमच्या कमरेला लंगोटी सुद्धा ठेवणार नाही, इशारा खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजे ना. निंबाळकर यांना काल पत्रकार परिषदेत दिला.
नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत विश्वासराव पायात पाय घालाल तर पाय काढला जाईल, असा इशारा आ. रामराजेंनी जाहीर सभेत दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काल साताऱ्यात पत्रकार परिषद घेत खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजे यांना इशारा दिला. यावेळी प्रल्हाद साळुंखे, जयकुमार शिंदे उपस्थित होते.
यावेळी खा. रणजितसिंह म्हणाले, श्रीरामच्या सभेत स्वतःला फलटणचे अधिपती म्हणवून घेणार्या रामराजेंनी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वासराव भोसले यांचे पाय काढले जातील, अशा प्रकारची भाषा केली. मी कधीही श्रीराम कारखान्याच्या कारभारावर किंवा कुठल्याही विषयावर आजपर्यंत बोललो नाही. सहकारामध्ये राजकारण नको म्हणून आम्ही जाणीवपूर्वक टाळत आलो. आम्ही नव्याने संस्था उभारल्या, चालवल्या पण जी संस्था स्वतःची नाही जी संस्था शेतकर्यांच्या मालकीची आहे त्या शेतकर्यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही जाहीरपणे करत असाल आणि आम्ही ते खपवून घेण्याची तुमची अपेक्षा असेल तर असं मुळीच होणार नाही.
स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन बापजाद्यांनी काढलेले कारखाने दुसर्याला चालवायला द्यायचे. गेल्या पंधरा वर्षात त्या कारखान्याचा हिशोब नाही, कर्ज किती आहे ते माहिती नाही. जमिनी विकल्यानंतर कर्ज किती आहे ते माहिती नाही. कारखान्याला मिळणारे वार्षिक उत्पन्न किती? सगळा भोंगळ कारभार आहे. ज्या कारखान्याला 12 ते 13 कोटी भाडे मिळायला पाहिजे. तेथे आम्ही ऐकतो सुरुवातीला दहा कोटी केले, नंतर पाच कोटी, आता तर 50 लाखच केलेत. दोन कोटी पैकी दीड कोटी त्यांना व्याजाचे द्यायचेत. अहो एखादा पेट्रोल पंप सुद्धा लोक त्याच्यापेक्षा जास्त किंमतीला चालवायला देतात. इथे पैशाचा भ्रष्टाचार होतोय हे न कळण्या इतकं आम्ही दूधखुळे आहोत का? शेतकर्यांनी दराविषयी बोलणं, दर मागणं हा शेतकर्यांचा हक्क असल्याचे खा. निंबाळकर यांनी म्हंटले.