थोरल्या पवारांनी पुन्हा डाव टाकला; रणजितसिंग मोहिते पाटलांच्या हाती तुतारी, आमदारकीचा दिला राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महायुतीत जागा वाटप सुरु आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी आपल्या आमदारकी आणि भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आजच सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. विधानसभेच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत असून राजकीय पक्षांना मोठे खिंडार पडत आहे. अशातच आता भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर मोहिते पाटलांच्या राजीनाम्याची पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असून रणजितसिंह यांना उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती. यावेळी पवारांच्या भेटीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील देखील आले होते, पण माध्यमांच्या भीतीमुळे ते भेट न घेताच निघून गेले. मात्र, आज त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाकडे पाठविला.

थोरल्या पवारांकडून भाजपला धक्क्यांवर धक्के

लोकसभा निवडणुकीतील निर्भेळ यशानंतर शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर बारामतीच्या शेजारील इंदापुरमध्येही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला दणका देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आठवडा उलटत नाही तोच बारामतीशेजारील फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांनीही तुतारी फुंकली. आता माढ्यातही रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. आज रात्रीच शरदचंद्र पवार पक्षात मोहिते पाटील प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्याने निर्णय बदलला

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्याने आपला निर्णय बदलला. त्यानंतर त्यांनाही पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. वडील आणि चुलत भावाचा अधिकृत पक्षप्रवेश झाला परंतु स्वत: रणजितसिंह यांनी अधिकृत राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचे टाळले. अगदी धैर्यशील मोहिते पाटील यांची लोकसभा प्रचारयंत्रणा रणजितसिंह यांनीच सांभाळली होती.