सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे माण तालुका काँग्रेस कमिटीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. “पैशाच्या बळावर विजय मिळवायचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला जनतेने लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली आहे. आता सुद्धा भाजपकडून विविध योजनांचे प्रलोभन दाखविण्यात येत आहे. ज्यांना काँग्रेसने मोठे केले ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसचा वापर करून भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करत देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी सातारा जिल्ह्याचे प्रभारी पक्ष निरीक्षक श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, मनीषा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अमरजित कांबळे, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष नकुसा जाधव, वसंतराव अवघडे, शिवाजीराव यादव, अॅड. संदीप सजगणे, नीलेश पोळ, बाळासाहेब आटपाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, ”माण मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. या मतदारसंघात ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह मिळावं ही येथील दलित, वंचितांसह सर्वांचीच लोकभावना आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, ही आमची आग्रही मागणी आहे.” यावेळी श्रीरंग चव्हाण म्हणाले, ”आम्ही सर्व मतदारसंघांत जाऊन कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकत आहोत. मते जाणून घेत आहोत. आपण आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. भाजपने फोडा अन् राज्य करा ही नीती अवलंबली आहे. या भाजप सरकारला जनता कंटाळली असून, हे सरकार हद्दपार करायचे आहे.