सातारा प्रतिनिधी | वैविधततेत एकता राखण्याची किमया केवळ भारतातच आहे. याची झलक तरूणाइने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारतीय भाषा उत्सवात अनुभवली. काश्मिरी, कन्नड, भोजपुरी, संस्कृत, गुजराती भाषेत संवाद साधून भारतीय भाषा आणि त्यांची समृध्द परंपरा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी, हिंदी, संस्कृत व अर्धमागधी, सांस्कृतिक विभाग व ज्युनियर कॉलेज विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीस माझी भाषा माझी स्वाक्षरी या उपक्रमात प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मातृभाषेत स्वाक्षरी केल्या. या वेळी सचिन मेनकुदळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी जम्मू कश्मीर येथील बी.ए.३ मधील विद्यार्थिनी शबनम खालिद हिने गोजरी भाषेत, संस्कृत विभागाचा विद्यार्थी आकाश थोरात याने संस्कृत भाषेत, मेघा सिंग हिने डोग्री भाषेत, काजल पंडीत हिने भोजपुरी भाषेत, प्रज्योत दिकोडे याने हिंदी भाषेत, संतोष हादमिनी यांनी कन्नड भाषेत, जम्मूचे रज्जबअली चौधरी याने गोजरी भाषेत, इरफान बशीर मियार याने काश्मिरी भाषेत मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक विभागातील संजना वाघमळे व दृष्टी रुईकर यांनी विविध भारतीय भाषेत गीते सादर केली. हार्मोनियम वादन दीपक सपकाळ यांनी केले तर तबलावादन सोमनाथ वाडेकर यांनी केले. रोहिणी पवार आणि अंकिता सावंत यांनी कोळी नृत्य सादर केले. आकांक्षा, अनुराधा आणि सानिका या विद्यार्थिनीनी दाक्षिणात्य गाण्यावर नृत्य केले. भारतातील विविध भाषेत विद्यार्थी बोलत असताना विद्यार्थी मनापासून ऐकत होते. विविध भाषेतली गाणी उत्सुकतेने ऐकत होते. तर कोळीनृत्याच्या अदा पाहून प्रेक्षक मनोमन आनंद घेत होते.